सांगली -जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची बदली रद्द करण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांकडून लाक्षणिक उपोषण आणि जत बंदचा नारा देण्यात आला होता. त्याला शहरातील दुकानदार आणि नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नगरसेवक उमेश सावंत, प्रभाकर जाधव, रिपाइंचे संजय कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे अमोल सावळे, रासपचे अजित पाटील आदींनी शहरातील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना बंदचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार शहरात दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक रामदास शेळकेंची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी जत बंद... हेही वाचा...डॉक्टर्स डे विशेष : 'साई' रुग्णालयातील डॉक्टर कोरोना काळात धारावीकरांसाठी ठरले देवदूत
याबद्दल काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत बातचित केली असता त्यांनी, 'लोकांना गुन्ह्याचा धाक दाखवून पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी पैसे काढले. भाजपचे सुनिल पवार, बाळ सावंत आणि जिल्हा परिषद शिक्षक धनाजी नरळे आदी लोक यात कार्यरत होते. याचा सर्वसामान्य जनतेला त्रास होत होता. आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. त्यावरून गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली. मात्र, रामदास शेळके यांनी चौकशीपुर्वीच बदलीचा अर्ज दिला. जर ते धुतल्या तांदळासारखे असते तर खुशाल चौकशीला सामोरे गेले असते' असा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार आणि कार्याध्यक्ष सुजय शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांसह केला.