सांगली - हरिपूर रोड, काळी वाट येथे शनिवारी रात्री भरधाव ट्रकने एका दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात रुचा सुशांत धेंडे (६) या चिमुरडीचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाकडून ट्रक चालकास बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे यात त्याचाही जागीच मृत्यू झाला आहे.
भरधाव ट्रकच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू, संतप्त जमावाच्या मारहाणीत ट्रक चालक ठार
सांगलीत हरिपूर रोड येथे शनिवारी रात्री अपघात झाला. या अपघातात ६ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर चालकाचा ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कमानीला धडकला. अपघातानंतर मुलीचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याठिकाणी असणाऱ्या जमावाने ट्रकवर हल्ला केला. तसेच ट्रकची तोडफोड करत चालकास बाहेर ओढून बेदम मारहाण केली. यावेळी चालकास दगडाने मारहाण करण्यात आल्याने कुमार आळगेकर (४५) या चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले.
अपघातात रुचाची आई आणि अन्य एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदिपसिंह गिल, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.