सांगली : शिराळा न्यायालयाने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना 2009 साली रेल्वे भरती प्रकरणी आंदोलन केल्यामुळे पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे. यामुळे राज ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनसेचे शिरीष पारकर यांना देखील बजावण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तारखेला हजर राहिले नसल्याने शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांना पुन्हा वॉरंट बजावले आहे.
काय आहे प्रकरण :राज्यामध्ये मनसेच्या वतीने 2009 साली रेल्वे भरती प्रकरणी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. तर मनसेचे नेते राज ठाकरे यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातल्या शेडगेवाडी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होता. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जबरदस्तीने दुकाने बंद करण्याबरोबर दगडफेकीचा प्रकार घडला होता.
14 वर्षांपासून सुनावणी सुरू : शिराळा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते शिरीष पारकर यांचा देखील समावेश होता. सदर गुन्ह्याचा खटला हा शिराळा न्यायालयामध्ये गेल्या 14 वर्षांपासून सुरू आहे.