सांगली - समाजात आज दुही निर्माण करण्याचे काम सुरू असून नव्या पिढीने एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या समता आणि ऐक्याचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. सांगलीच्या वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची गुरुवारी 99 वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जन्मशताब्दी वर्ष समारंभाचे सांगलीच्या वाटेगाव या आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार, राष्ट्रवादीचे मुंबईचे आमदार जितेंद्र आव्हाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आदी उपस्थित होते.