सांगली- अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग आपण नरेंद्र मोदींना सांगितल्यामुळे वाढवण्यात आला. त्यामुळे मी सत्तेत नसतानाही, सत्तेतील लोकांना हलवू शकतो, असा अप्रत्यक्ष टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. सांगलीच्या रामानंद नगर येथे पूरग्रस्तांशी संवाद साधताना पवारांनी हा टोला लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांनाही केली होती सूचना
अलमट्टी धरणातून जेवढे पाणी सोडले पाहिजे होते. ते सोडलं गेलं नाही, त्यामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात महापूराची परिस्थिती भीषण झाली, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. अलमट्टी धरणातून पाणी सोडले गेले नाही, तर सांगलीपर्यंत फुगवटा होतो, हा इतिहास आहे. त्यामुळे आपण राज्य सरकारकडून कर्नाटकच्या सरकारला विसर्ग करण्याबाबत विनंती करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विसर्ग वाढवण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काही दिसले नाही.
शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते त्यांनी स्वत: कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरुप्पा यांच्याशी शुक्रवारी पुन्हा संपर्क साधून अलमट्टीतून विसर्ग वाढवण्याची विनंती केली होती. त्यानंतर धरणातून 5 लाख 30 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
मात्र, मुख्यमंत्री फडवीसांच्या या वक्तव्याची शरद पवारांनी सांगलीच्या रामानंद नगरमध्ये पूरग्रस्तांसमोरच पोलखोल केली आहे.
पवार म्हणाले, कर्नाटक सरकारकडून विसर्ग वाढवण्याचे जाहीर करण्यात आलेले मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. यामुळे आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शुक्रवारी सायंकाळी संपर्क साधला आणि त्यांच्या पुढे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचे वास्तव स्पष्ट केले. तसेच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला नाहीतर पूरग्रस्त भागातील जनजीवन उद्धवस्त होईल. त्यामुळे कर्नाटक सरकारला आपण सूचना द्याव्यात अशी विनंती केली.
पवार यांच्या विनंतीनंतरच अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. हे पूरग्रस्तांना सांगताना शरद पवारांनी आपण सत्तेत नसतानाही सत्तेतील लोकांना हलवू शकतो, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांना लगावला.