सांगली- माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक यांनी भाजप पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर ( Shivajirao Naike slammed Chandrakant Patil ) निशाणा साधला. दोन एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.
भाजपला राम-राम,राष्ट्रवादीत प्रवेश ...
माजी आमदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक ( Ex MLA BJP leader Shivajirao Naike ) यांनी अखेर भाजपाला रामराम केला आहे. भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे पत्रकार परिषेदत स्पष्ट केले आहे. दोन एप्रिल रोजी शिराळा ( Shivajirao Naike party change ) या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुक्यातील भाजपा पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.
चंद्रकांत पाटलांकडून दबाव टाकण्याचे काम !
यावेळी बोलताना शिवाजीराव नाईक म्हणाले, आमचा पक्षातील कोणावर राग नाही किंवा रागापोटी आम्ही पक्षातून बाहेर पडत नाही. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून आम्हाला योग्य वागणूक मिळाली नाही. उलट कोल्हापूरमधील राजकारण सांभाळण्यासाठी आमच्या तालुक्यात दाबले. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात त्यांच्याकडून वेगळे राजकारण करण्यात आले, अशी टीका माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी केली आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश ?
दरम्यान राजीनाम्याची माहिती देताना, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी 2 तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणणण्याऐवजी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे चुकून जाहीर केले. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन शिवाजीराव नाईक यांना ट्रोल करण्यात येत आहे.