सांगली - घरांवर होणाऱ्या दगडांच्या वर्षावमुळे दहशतीखाली असणाऱ्या शिराळा तालुक्यातील गिरजवडे ग्रामस्थांची सुटका झाली आहे. देवीचा कोप की कोणाचा खोडसाळपणा याचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणी गावातील दत्तात्रय रघुनाथ पाटील, किसान बबन बिळासकर, प्रताप सीताराम माने, या तिघांना अटक करत पोलिसांनी या संपूर्ण प्रकारावर पडदा टाकला आहे.
सांगली जिल्ह्यातील गिरजवडे गावातील घरांवर होणाऱ्या दगडांच्या वर्षावाचे गूढ उघड - Girjavade village stone falling news
घरांवर होणाऱ्या दगडांच्या वर्षावाचे रहस्य उघड झाले आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
शिराळा तालुक्यातील गिरजवडे या गावातील घरांवर मागील सात दिवसांपासून दगडांचा वर्षाव होत होता. यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले होते. यामध्ये सहा सात घरांच्या कौलांची चाळण झाली आहे. रात्रीच्या वेळी घरावर दगड पडत असल्याने कौले फुटून दोन महिला किरकोळ जखमी झाले होते. यामुळे गावातील शंकर दत्तात्रय पाटील यांनी शिराळा पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यावरून एपीआय विशाल पाटील यांनी योग्य तपास करून वरील तिघांना अटक केली आहे.
दत्तात्रय रघुनाथ पाटील यांचे व तक्रारदार शंकर पाटील यांच्यामध्ये पैशाच्या देवाण घेवानी वरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. याच रागापोटी दत्तात्रय यांनी आपल्या साथीदारा सोबत स्वतःच्या घराच्या छतावरून शंकर पाटील यांच्या घरावर दगड मारून भीती पसरवली होती. हे करत असताना लांबून दगड मारताना शेजारच्या घरावरही दगड पडत असल्याचे सांगितले. विशाल पाटील यांना तपास करताना गावकऱ्यांमधील अंधश्रद्धेच्या विषयावरून सुरू असेलेल्या चर्चेचा विचार करून तपास करावा लागला. अखेर विशाल पाटील यांनी आरोपींना पकडून गावात झालेला देवीचा प्रकोप की रागापोटी केलेला प्रताप हे सत्य बाहेर काढल्याने आठ दिवस चालेल्या प्रकारावर अखेर पडदा पडला आहे.