सांगली- एखाद्या कल्पनेला राजाश्रय बरोबरच लोकाश्रय मिळाल्यास काय होऊ शकते सांगलीच्या आरग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने दाखवून दिले आहे. आरग येथे लोकसहभागातून जिल्हा परिषदेची मराठी मुलींची शाळा आज हायटेक बनली आहे. येथील मुलींना डिजिटल शिक्षणाचे धडे देण्याबरोबच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था सुद्धा केली गेली आहे.
लोकसहभागातून मुलींना डिजिटल शिक्षणाचे धडे दिल्या जाणाऱ्या शाळेबद्दल माहिती देतांना ईटीव्ही भारत चे प्रतिनिधी
'बेटी बचाओ, बेटी पढाओचा' नारा शासनाकडून देण्यात येत आहे, त्यातून शासन स्तरावर मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी अनेक योजनाही अंमलात आणल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात मुलींना कितपत शिक्षण मिळते, हा प्रश्न आहे ? पण शासनाच्या योजनेला जर जनतेची साथ मिळाली, तर त्याचा कायापालट होऊ शकतो हे सांगलीच्या मिरज तालुक्यातील आरग येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेने दाखवून दिले आहे. लोकसहभागातून ही शाळा "हायटेक" बनविण्यात आली आहे. लोकवर्गणीतून जिल्हा परिषदेच्या शाळेचे आज रुपडे पालटले आहे. ज्ञानाबरोबरच डिजिटल शिक्षणाचे धडे या शाळेत दिले जात आहे. त्यासोबतच मुलींची सुरक्षा व आरोग्याची सुविधा सुद्धा या शाळेत उपलब्ध करण्यात आली आहे.
शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक वर्गात एलसीडी टीव्ही, फॅन, कम्प्युटर, पिण्यासाठी आर.ओ वॉटर, अद्यावत प्रयोग शाळा अशा अनेक सुविधा मुलींसाठी उपलब्ध आहेत. एखाद्या इंग्रजी शाळेत असणाऱ्या सुविधा प्रमाणे या अद्यावत शिक्षण प्रणालीला शोभेल अश्या सुविधा या जिल्हा परिषदेच्या शाळेत लोकसहभागातून निर्माण झाल्या आहेत.
शाळेच्या प्रांगणात मुलींना नेहमी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात बाहेर प्रार्थनेसाठी किंवा इतर कारणांसाठी अडचण येत होती. ती लक्षात घेता याठिकाणी गावातीलच एका अमेरिकेतील स्थायिक ग्रामस्थाने सभामंडप उभारून शाळेच्या विकासाला हातभार लावला आहे.
सध्या बारा शिक्षकांचा समूह या शाळेत शिक्षणाचे धडे देत आहे. रविवारीसुद्धा ही शाळा भरते आणि खाजगी शाळांप्रमाणे या ठिकाणी अधिक तास घेतले जाते. याचाच परिणाम गेल्या पाच वर्षात या शाळेतील ३७ मुली शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले आहेत. तर या शाळेचे यश आणि या ठिकाणी मुलींसाठी असणाऱ्या अद्यावत भौतिक सुविधा, यामुळे शाळेची पटसंख्येत वाढ झाली आहे. आज जवळपास ३३२ मुली या शाळेत शिक्षण घेत असून, एवढी मोठी पटसंख्या असणारी जिल्हयातील जिल्हा परिषदेची ही एकमेव शाळा ठरली आहे. त्यामुळे, जिल्ह्यात एक आदर्श मराठी मुलींची शाळा म्हणून या शाळेचे नाव प्रसिद्ध झाले आहे.