सांगली- कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये तब्बल पाचशे कोटींच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक करुन दुप्पट व तिप्पट नफा देण्याच्या आमिषातून हा घोटाळा झाला आहे. जिल्ह्यातील इस्लामपूर महारयत ऍग्रो कंपनीकडून हा घोटाळा करण्यात आला आहे.
कुक्कुटपालनाच्या नावाखाली तब्बल 500 कोटींचा गंडा कडकनाथ कुक्कुटपालन योजनेत गुंतवणुकीची भन्नाट योजना सुरू करण्यात आली. ‘रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका व लाखो रुपयांचा नफा मिळावाट', अशी योजना आखण्यात आली. या योजनेत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 8 हजारांवर शेतकरी व बेरोजगार तरुणांनी सुमारे 500 कोटींच्या आसपास गुंतवणूक केली. मात्र, या कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील त्यांच्या कार्यालयांना टाळे लावले आणि धूम ठोकली. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगावच्या संदीप आणि सुधीर मोहिते या बंधुंनी 2 वर्षापूर्वी महारयत ऍग्रो कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून कडकनाथ कोंबडी पालनाची ही भन्नाट योजना सुरू केली. अवघ्या 75 हजार रुपयात लाखोंची कमाई होत असल्याने राज्यातील अनेक शेतकरी व बेरोजगार तरुणांनी यात गुंतवणूक केली. मात्र, आता या कंपनीने राज्यातील आपल गोरखधंदा गुंडाळत पोबारा केला आहे. त्यामुळे सर्व गुंतवणूकदार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कंपनीचे मुख्य संचालक असणाऱ्या सुधीर मोहिते यांनी सोशल मीडियावर या सर्व गोष्टींचे खंडन करत कोणत्याही प्रकारे गुंतवणूकदारांची फसवणूक होणार नाही. कंपनी अडचणीत सापडली असल्याने अनेक गोष्टी निर्माण झाल्या आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांकडून अंडी व पक्षी खरेदी हे केले जाणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन एका व्हिडिओद्वारे केले आहे.
असा आहे कडकनाथ कोंबडी पॅटर्न -
गुंतवणूकदाराने 75 हजारांची गुंतवणूक केल्यास 200 पक्षी दिले जातात. पक्षी घेताना प्रथम 40 हजार व उर्वरित 35 हजार 3 महिन्यानंतर जमा करावयाचे होते. या कालावधीत 200 पक्षांच्या युनिटसाठी कंपनीकडून खाद्य, औषधे, लस व भांडी दिली जात होती. तीन महिन्यानंतर कंपनी गुंतवणूकदारांकडून 80 पक्षी घेऊन जात. गुंतवणूकदारांकडे 100 मादी आणि 20 नर ठेवली जातात. तर 4 ते 5 महिन्यानंतर पक्ष्यांनी अंडी देणे सुरु केल्यानंतर कंपनीकडून पहिल्या टप्प्यात 2 हजार अंडी प्रतिनग 50, दुसऱ्या टप्प्यात 2 हजार अंडी 30 रुपये व तिसऱ्या टप्प्यात 3500 अंडी 20 रुपये या दराने घेण्यात येतात. यातून गुंतवणूकदाराला एका वर्षात 2 लाख 30 हजार आणि 375 रुपयाप्रमाणे 120 पक्ष्यांच्या विक्रीतून 45 हजार असे सुमारे पावणे तीन लाख रुपये मिळण्याचे आमिष दाखविले गेले.