महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत संजयकाका पाटील यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपमधील गटबाजीमुळे पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, अखेर त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

संजयकाका पाटील

By

Published : Mar 21, 2019, 11:53 PM IST

सांगली - विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यापासून पक्षातल्या गटबाजीमुळे पाटील यांच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाला होता. अखेर पक्षातल्या नेत्यांच्या बरोबर दिलजमाई झाल्याने पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.

संजयकाका पाटील

भाजपतल्या गटबाजीमुळे संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यमान खासदारांच्या ऐवजी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी मिळेल, अशी जोरदार चर्चा पक्षात आणि राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. मात्र, अखेर आज संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. सकाळी भाजपची कोअर कमिटीची बैठक सांगलीमध्ये पार पडली. यावेळी जिल्ह्यातल्या सर्वच नेत्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेचे आमदार आणि प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. विद्यमान खासदार यांच्या उमेदवारीबाबत याठिकाणी सगळ्यांनीच सहमती दर्शवल्यामुळे पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे संध्याकाळी पक्षाकडून पाटील यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

पाटलांचे नाव जाहीर झाल्यानंतर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी संजयकाका पाटील यांची भेट घेत अभिनंदन केले. यावेळी बोलताना पाटील यांनी पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला आणि या विश्वासास नक्कीच पात्र राहू तसेच गेल्या ५ वर्षात जी कामे शिल्लक राहिली ती पूर्ण करू, असे सांगितले. तसेच या निवडणुकीत मी गेल्या ५ वर्षात केलेल्या विकास कामांच्यामुळे मतदार पुन्हा मला भरघोस मतांनी विजय करतील, त्याच बरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मतांच्या फरकाने आपला विजय होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपमधील बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री पडळकर यांची समजूत काढतील. तसेच आता मला उमेदवारी मिळाल्याने मी ही त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details