सांगली- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येवरुन भाजपा खासदार संजयकाका पाटील प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहे. सांगली जिल्ह्यात दररोज उपचाराविना रुग्ण मरत आहेत,असा आरोप पाटील यांनी केला आहे. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला.
संजयकाका पाटील, खासदार सांगली सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरुच आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यू मध्येही वाढ सुरुच आहे. शिवाय इतर रुग्ण सुद्धा उपचाराविना रोज मरत आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही सांगली जिल्ह्याचा मृत्यू दर राज्याच्या दुप्पट असल्याचे जाहीर करत प्रशासनाची कानउघाडणी केली होती. मात्र,कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. बेड आणि वेळेत उपचार मिळत नसल्याने इतर रुग्णांच्या मृत्यू संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यातील सर्व सामान्य जनता मृत्यूच्या सावटाखाली जगत,असल्याचे सांगली जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण
खासदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि प्रशासनाच्या कारभारावर निशाणा साधला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूची वाढती संख्या परिस्थिती हाताबाहेर निघाली आहे. सर्वसामान्य रुग्णांची सुद्धा मोठी फरपट सुरू असून कोरोना नसलेल्या रुग्णांना सुद्धा वेळेत उपचार आणि बेड मिळत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुंबई-पुणे व बाहेरच्या ठिकाणी असणारे अतिरिक्त डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांना पाचारण करण्याची गरज आहे.त्यादृष्टीने कोरोना रुग्णालय निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, याउलट प्रशासनाचा कारभार सुरू असल्याची टीका खासदार पाटील यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि प्रशासनाला आपण वारंवार कोरोना नियंत्रणाच्या बाबत सूचना करत आहे. मात्र, जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कारभार करत असल्याचा आरोपी खासदार पाटील यांनी केला आहे. सध्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत प्रशासनाचा सुरू असलेला अनागोंदी कारभार,येत्या काही दिवसात सुधारला नाही. उपचाराविना रुग्णांचा मृत्यू सुरुच राहिले तर मृतदेह घेऊन सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू,असा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यासह प्रशासनाला दिला आहे.