राज्यातील आणखी एक काँग्रेस 'निष्ठावंत' घराणे भाजपच्या गळाला
काँग्रेस सोडण्यापाठीमागे सत्यजित देशमुखांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेचे कारण दिले आहे. शिवाजीराव देशमुख हे विधानपरिषदेचे सभापती असताना त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता, हे आम्ही विसरू शकत नाही.
सांगली- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक निष्ठावंत घराणी भाजपमध्ये डेरेदाखल होत आहेत. शिराळा काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कासेगाव येथे भाजपमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव व माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, नगरमधील काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे सुपुत्र डॉ. सूजय विखे-पाटील तसेच रणजित नाईक-निंबाळकर यांच्याबरोबरच आता सांगलीच्या शिराळ्यातील देशमुख घराण्यानेही काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये दाखल झाले आहे.
काँग्रेस सोडण्यापाठीमागे सत्यजित देशमुखांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेचे कारण दिले आहे. शिवाजीराव देशमुख हे विधानपरिषदेचे सभापती असताना त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता, हे आम्ही विसरू शकत नाही. त्यावेळी मानसिंग नाईक, जयवंतराव पाटील कोठे गेले होते? असा सवाल करत काँग्रेसने नेहमी कार्यकर्त्यांना कमी लेखून राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यासाठी आमचा बळी दिला, असे त्यांचे म्हणने आहे.
कोण आहेत सत्यजित देशमुख -
सत्यजित देशमुख हे विधान परिषदेचे माजी सभापती, ज्येष्ठ दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे सुपूत्र व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे साडू आहेत. देशमुख घराणे आत्तापर्यंत कट्टर काँग्रेस विचारांचे मानले जात होते. सत्यजित देशमुख राज्य काँग्रेसचे सरचिटणीस आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यांनी रविवारी या पदांचा राजीनामा दिला.
शिवाजीराव देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते १९९६ आणि २००२ मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्याआधी १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० असे चार वेळा ते विधानसभा निवडणुकीत निवडून आले.
राज्याच्या विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून येण्याची हॅट्ट्रिक शिवाजीराव देशमुख यांनी केली होती. ते ऑगस्ट २००४ ते एप्रिल २००८ आणि एप्रिल २००८ ते मार्च २०१५ पर्यंत असे ११ वर्षे सभापती पदी होते. आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी १९५६ ते ६७ या काळात त्यांनी सांगली जिल्ह्यात विस्तार अधिकारी पदावर ९ वर्षे शासकीय सेवा केली. १९६७ मध्ये बिळाशी जिल्हा परिषद मतदारसंघातून सांगली जि.प. वर ते बिनविरोध निवडून गेले.