सांगली - आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा प्रत्यक्ष शाळांना सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बहुतेक शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी मुले आणि शिक्षकांमध्ये उत्साह पहायला मिळाला. कोरोनाच्या नियमांचे पालन करून वर्ग भरले होते.
50 हजार विद्यार्थी वर्गात दाखल !
सांगली जिल्ह्यात 750 शाळा आहेत. त्यापैकी बहुतांश शाळा आज सुरू झाल्या आहेत. सध्या फक्त नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. यामधील दीड लाख विद्यार्थ्यांपैकी पन्नास हजार विद्यार्थ्यांनी संमतीपत्र दिले आहेत. आणि बहुतांश विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात दाखल झाले. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग इत्यादी गोष्टींचे सक्तीचे पालन करण्यात आले. याशिवाय शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ आणि जेवणाचा डबा आणण्याची शाळा प्रशासनाने मनाई केली आहे. दररोज केवळ चार तास शाळा भरणार आहे.
ऑनलाइनपेक्षा प्रत्यक्ष शिक्षण उत्तम -
पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण मिळत होते. मात्र, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. ऑनलाइन अभ्यास समजण्यामध्येही अनेक समस्या येत होत्या. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.