सांगली- शहरातील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. तीनही मुले हनुमाननगर येथून बेपत्ता झाली होती. मुले बेपत्ता झाल्याचे कळताच त्यांच्या नातेवाईकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मुलांचा शोध घेतला व त्यांना शोधून सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
मुले बपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच सांगली पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. तीनही मुले मिरज रेल्वे स्थानकावरून महालक्ष्मी एक्सप्रेसने पुण्याच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सांगली पोलिसांनी सातारा रेल्वे पोलिसांना याप्रकरणाबाबत कल्पना दिली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केले असता त्यांना सातारा रेल्वे स्थानक येथे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये संशयित इसमासह तीन मुले दिसून आली. पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन तीनही मुलांची सुखरूप सुटका केली आहे. रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले, तर या प्रकरणी संशयित व्यक्तीस अटक केली आहे.