सांगली - सांगलीमध्ये राष्ट्रवादी शहर काँग्रेसकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला साडीचोळीचा आहेर करत, प्रतिमेचे दहन करण्यात आले. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल पडळकर यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा सांगली शहरात त्यांना फिरू देणार नाही. प्रसंगी गाढवावरून त्यांची वरात काढू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर राज्यभरात आमदार पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. आज (गुरुवार) दुसऱ्या दिवशीही सांगली जिल्ह्यात आमदार पडळकर यांच्या विरोधात आंदोलन कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक युवराज बावडेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.
सांगली राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपीचंद पडळकर विरोधात आंदोलन हेही वाचा...'याचा' उद्रेक होण्यापूर्वी भाजपने पडळकरांना समज द्यावी - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
विश्रामबाग याठिकाणी संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला साडीचोळीचा आहेर करत, जोडे मारत पडळकर यांचा जोरदार निषेध नोंदवला. तसेच पडळकर यांच्या प्रतिकात्मक फलकाचे दहन करत संताप व्यक्त केला.
शरद पवार यांच्यावरील टीका कोणत्याही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे आमदार पडळकर यांनी केलेल्या टीकेबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा आमदार पडळकर यांना सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस फिरू देणार नाही. प्रसंगी त्यांच्या तोंडाला काळे फासून गाढवावरून वरात काढू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक युवराज बावडेकर यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण...
पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केले. गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, "शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे, असे माझे मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचे नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे." असे विधान पडळकर यांना केले.