सांगली -विटा परिसरात बिबट्याच्या दर्शनामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भाळवणी पानसेमळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र अधिकाऱ्यांना या ठिकाणी बिबट्या अथवा बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दोन बिबटे दिसल्याचा शेतकऱ्यांचा दावा
विटा-भाळवणी रस्त्यावरील पानसेमळा याठिकाणी सोमवारी रात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याला बिबट्या व एक बिबट्याचे पिल्लू आढळून आले आहे. सोमनाथ जाधव हे आपल्या शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या दिसून आला. सोमनाथ यांच्यावर त्यातील एका बिबट्याने हल्ला केला, मात्र त्यांच्यासोबत कुत्रा असल्याने बिबट्याचा हल्ला अयशस्वी ठरला आणि बिबट्याने शेजारी असलेल्या उसाच्या शेतात धूम ठोकली. या घटनेची माहिती सोमनाथ यांनी आपल्या मित्रांना दिली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने बिबट्याचा शोध घेण्यात आला. मात्र बिबट्या या ठिकाणी आढळून आला नाही.
विटा परिसरात बिबट्याचा वावर घटनास्थळी वनाधिकारी दाखल
दरम्यान दोन दिवसांपासून विटा शहर व परिसरात बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. वनविभागाला याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांना परिसरात कुठेही बिबट्या आढळून आलेला नाही, तसेच कुठेही बिबट्यांच्या पावलांचे ठसे देखील आढळून आले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, काळीजी घ्यावी, तसेच कुठेही बिबट्या आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.