सांगली - 'महाराष्ट्रात कोरोना वाढीचा कल सध्या स्थिर होत आहे. जनतेने आणखी कडक निर्बंध पाळल्यास भविष्यात कोरोना वाढीचा कल खालावेल', असा विश्वास जलसंपदामंत्री व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये महाराष्ट्र दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
आणखी कडक निर्बंध पाळल्यास कोरोना रूग्णवाढीचा कल खालावेल - जयंत पाटील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन साजरा
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाच्या निर्बंधांचे पालन करून हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
'कोरोना स्थिर, पण निर्बंध पाळल्यास आणखी कमी होईल'
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, की 'कोविडमुळे जी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कामगार आणि कष्टकरी वर्गावर फार मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातून मार्ग काढण्याची आपणा सर्वांना शक्ती मिळो. सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करित आहे. कोरोनाचा वेग सध्या स्थिर झाल्यासारखा दिसत आहे. येत्या काळात प्रतिबंधक निर्बंधाचे आपण कडक पालन केल्यास आणखी वेग कमी झालेला दिसेल. पण आज महाराष्ट्र अनेक बाजूंनी संकटात आहे. अशावेळी या संकटाचा धिराने मुकाबला करून मार्ग काढण्याची शक्ती आपणा सर्वांना मिळो'.
हेही वाचा -'पश्चिम बंगालमध्ये लढत अटीतटीची, पण सत्ता ममता बॅनर्जींचीच येणार'
हेही वाचा -एनसीबीची गोवा व मुंबईत कारवाई; दोन तस्करांना अटक