सांगली: Sangli Ganesh Visarjan: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला आहे. तर दोन तरुणांच्या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट (Djs Noise) कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद मधील शेखर पावशे, वय (32) आणि वाळवा तालुक्यातील दुधारी येथील प्रवीण शिरतोडे, वय (35) असे मृत तरुणांचे (Two Died In Sangli) नावे आहेत.
शेखरची झाली होती अँजिओप्लास्टी: सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका (Ganesh Visarjan) पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हा मृत्यु झाला आहे. यापैकी शेखर पावशेची १० दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. यानंतर सोमवारी रात्री गावातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शेखर गेला होता. यावेळी डीजेचा दणदणाट सुरू असताना शेखरला काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले. यावेळी शेखर घरी पोहोचल्यानंतर भोवळ येऊन खाली पडल्यावर त्याचा मृत्यू झाला.
डीजेच्या दणदणाटामुळे हा मृत्यू? : प्रवीण शिरतोडे हा गावातील मिरवणूकीमध्ये सामील झाला होता. यावेळी मिरवणुकीमध्ये डॉल्बीचा दणदणात सुरू होता. काही अंतर चालल्यावर प्रवीण शिरतोडे याला देखील अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तो गावातल्या बस स्थानकाजवळच मिरवणुकीतच चक्कर येऊन पडला आणि त्याचा मृत्यू झाला. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमधील डीजेच्या दणदणाटामुळे हा मृत्यू झाल्याचे बोललं जातं आहे.
मिरवणुकीत आला हृदयविकाराचा झटका: प्रवीण शिरतोडे हे सेंट्रींग व्यवसायिक आहेत. सोमवारी ते कामावरून घरी परतत असताना त्यांची दुचाकी बंद पडली होती. प्रवीण शिरतोडे हे दुचाकी ढकलत घरी पोहोचले होते. त्यानंतर घराजवळ गाडी लावून थोड्या वेळातच गावात निघालेली विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी घरातून बाहेर पडले. आधीच दुचाकी ढकलून प्रवीण शिरतोडे हे दमले होते. अशात त्यांनी डीजेच्या दणदणाटा मध्ये मित्रांसोबत नाचण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्यांना चक्कर येवून हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व वडील असा परिवार आहे.