सांगली - सांगली शहरातील महापूर आता ओसरला आहे मात्र पूर ओसरल्यानंतर एक भयंकर परिस्थिती समोर येऊ लागली आहे. शहरातील घरे, व्यापार सर्व कसे उद्ध्वस्त झाले आहेत, याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
पुराच्या विळख्यातून मोकळा श्वास घेणाऱ्या शहराचे भीषण वास्तव - पूर ओसरल्यानंतर एक भयंकर परिस्थिती
सांगली शहरातील महापूर आता जवळपास ओसरला आहे. इतर भागातील पाणी देखील आता ओसरू लागले आहे. मात्र पुराच्या विळख्यातून मोकळा श्वास घेणाऱ्या शहराची एक भयानक परिस्थिती समोर येऊ लागली आहे.
पूर्ण सांगली शहरालाच जवळपास महापुराने वेढा घातला होता. आता हा भीषण महापूर ओसुरू लागला आहे. शहरातील निम्म्याहून अधिक भाग आता जवळपास पुराच्या विळख्यातून सुटला आहे. पाणी ओसरू लागल्यानंतर प्रचंड दुर्गंधी, गाळ आणि घाणीचे साम्राज्य, अतोनात झालेलं नुकसान असे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
सांगली शहराला स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासनाचे व राज्यातील विविध भागातून आलेले पालिका सफाई कर्मचाऱ्यांबरोबर सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते शहराच्या विविध भागात आता युद्ध पातळीवर स्वच्छता करत आहेत. पुरात वाहून आलेला कचरा, रस्त्यावर साचलेली गाळ, घाण, मेलेली जनावरे, काढण्याचं काम सध्या सांगली शहरभर पाहायला मिळत आहे. त्यामुळे रोगराईच्या नव्या संकटाला परतवून लावण्यासाठी हजारो हात झटताना दिसत आहेत.