सांगली - जिल्ह्यात प्रलयकारी महापुराने थैमान घातले आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या महापुरामुळे १०० हून अधिक गावातील ८० हजारहुन अधिक नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. तर, हजारो नागरिक आद्यपही पुरात अडकले आहेत. मात्र, त्यांच्या बचावकार्यामध्ये बोटींची कमतरता ही मोठी अडचण येत आहे. पण तरीही बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराकडून युध्दपातळीवर काम सुरू आहे.
सांगली जलमय : महापुराच्या विळख्यात अजूनही हजारो नागरिक, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु पुनर्वसन करण्यात आलेली आकडेवारी :
मिरज - 19 गावांतील 3,639 कुटुंबांतील 19,697 लोक व 5,580 जनावरे.
पलूस - 22 गावांतील 4,114 कुटुंबांतील 19,204 लोक व 5,510 जनावरे.
वाळवा - 30 गावांतील 4,307 कुटुंबांतील 19,532 लोक व 7,279 जनावरे.
शिराळा - 17 गावांतील 292 कुटुंबांतील 1,318 लोक व 2,298 जनावरे.
तर, सांगली महानगरपालिका क्षेत्रातील 907 कुटुंबांतील 9,963 लोक व 443 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.
संपर्क तुटलेली गावं..
मिरज - बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, मौजे डिग्रज.
वाळवा - शिरगाव, भरतवाडी.
पलूस - भिलवडी, तावदरवाडी, सुखवाडी, राडेवाडी, सूर्यगाव, तुपारी, बुर्ली, नागराळे, दह्यारी, घोगाव, पुणदी.
या गावांचा संपर्क तुटल्यामुळे याठिकाणी हजारो नागरिक अद्याप अडकून पडले आहेत.
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात तीन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) दाखल झाली असून टेरिटोरियल आर्मीचे 211 जवान दाखल झाले आहेत. यासोबतच कोल्हापूर, पुणे-चिंचवड महानगरपालिका यांच्या पथकांकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.