सांगली - सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आलेला आहे. मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर कोयना व चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे, दोन्ही नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. दोन्ही नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या शेकडो गावांसह सांगली शहराला मोठा फटका बसला आहे. नदीकाठी असणाऱ्या सुमारे 31 हजार नागरिकांचे, तर 4 हजार जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर पाण्याची पातळी वाढत असल्याने अनेक गावांना पुराचा वेढा पडत आहे. त्यामुळे, सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) दाखल झाले असून, नदीकाठच्या गावांमध्ये बचावकार्य सुरू आहे. शिरगाव ,कसबे डिग्रज येथे एनडीआरएफने सुमारे 100 हून अधिक नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केली आहे.
सांगली शहर जलमय..
सांगली शहराला या महापुराचा मोठा फटका बसला आहे. सांगली शहर आणि उपनगरामध्ये महापुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे सांगली शहर जलमय बनले आहे. शहरातील टिळक चौक, मारुती चौक, शिवाजी मंडळ परिसर, गावभाग पोलीस चौकी रोड, मथुबाई गरवारे महाविद्यालय, कोल्हापूर रोड, पाटणे प्लॉट, भारत नगर, शामराव नगर, मल्टीप्लेक्स, आयुक्त बंगला, मगरमच्छ कॉलनी, गवळी गल्ली, जामवाडी, जुना बुधगाव रोड, कर्नाळ रोड, राजवाडा चौक आणि स्टेशन चौक या भागांना पाण्याचा वेढा पडला आहे.
वाहतूकही पुराच्या विळख्यात..
अनेक गावांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे, या गावांशी असणारा संपर्क तुटला आहे. सांगली शहरातून कोल्हापूरकडे जाणारा मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्याने बंद झाला आहे. तर, इस्लामपूरकडे जाणारा मार्गही बंद झाला आहे. आयर्विन पूल जवळ्याच्या टिळक चौक आणि बायपास या दोन्ही ठिकाणी पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला मिरज तालुक्यातील म्हैसाळ-कागवाड रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने कर्नाटककडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. मिरज-शिरोळ मार्गावरही कृष्णाघाट नजीकच्या अर्जुनवाड हद्दीतील रस्त्यावर पुराचं पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे.