सांगली- 'आवंदा पाऊस पाणी होईल, चांगलं पीक येईल, हातात दोन पैक येतील, पण दुष्काळाचा फेरा काय संपत नाय, अन हाताला काय लागत नाय, पण करायचा काय म्हणून दरवेळी पीक पेरा घेतोय' ही व्यथा आहे, गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या चक्रात पेरणीचा फेरा घेणाऱ्या सांगलीच्या धुळगाव येथील किसन माने यांची. यंदाही माने यांनी मोठ्या अपेक्षाने पावसाच्या भरवशावर पेरणी केली आहे.
सांगली जिल्ह्यातला पूर्व भाग तसा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. आटपाडी कवठेमहांकाळ तालुक्यात दुष्काळ हा जणू पाचवीलाच पुजलेला आहे. काळानुसार वर्षानुवर्षे तालुक्यात दुष्काळाची छाया गडद होती गेली. दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी शासनाकडून वरदान ठरणाऱ्या टेंभू-ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजना राबवण्यात आल्या, मात्र अद्याप या योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळ अजून हटू शकला नाही. परिणामी आजही पावसावरच जत, आटपाडी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे आणि या दुष्काळाच्या दृष्टचक्रात आजही इथला शेतकरी अडकून पडलाय, अशाच एक शेतकऱ्यांपैकी कवठेमंकाळ तालुक्यातल्या अग्रणी धुळगाव येथील शेतकरी म्हणजे किसन माने..
फारसं शिक्षण नसणारे किसन माने यांची गावाबाहेरील वस्तीवर अर्धा एकर शेतजमीन आहे. दोन मुलं पत्नी आणि नातू असे सहा जणांचं कुटुंब. अनेक वर्षांपासून शेती करणाऱ्या मानेंची अवस्था त्यांच्या घराकडे एक नजर टाकली, तर क्षणात कळून येते, दोन छोट्या खोल्यांचे झोपडीचे खोपटे म्हणजे माने यांचे घर. आणि त्यांच्या या घराची अवस्था पाहून माने यांचे परिस्थिती काय आहे, हे सर्व काही आपसूक सांगून जाते.
पाण्याअभावी खरिपासह रब्बीही गेलं...
निसर्गावर अवलंबून असणारे माने कुटुंब आज खडतर प्रवासाची वाट तुडवत निघाले आहे. कारण वाट्याला अर्धा एकर शेत जमीन असूनही माने यांच्या हाताला काहीच लागत नाही. पण दुष्काळापुढे न झुकता माने यांनी दुष्काळाशी दोन हात करणे आजून सोडले नाही. माने आजही आपल्या शेतात काही तरी पिकेल या आशेने आणि करायचे काय या भावनेतून पेरणी करायचे थांबले नाहीत. गेल्यावर्षी माने यांनी खरिपात उडीद आणि बाजरीचे पीक घेतले होतं. काबाडकष्ट करत शेतीची मशागत करून पेरणी घेतली आणि पावसाच्या प्रतीक्षेत राहिले पण पुरेसा पाऊस झाला नाही. थोड्या प्रमाणात उडदाचे आणि बाजरीचे पीक आले पण निम्म्याहून अधिक पीक पाण्याअभावी करपून गेलं.
पण माने यांच्याकडे जिद्द अफाट पुन्हा रब्बी हंगामात मशागत, कुळवणी आणि पेरणी केली. मक्याची लागवड केली. पण तेही पाण्याअभावी नीट बहरू शकले नाही आणि व्हायचे तेच झालं. आर्धी-अधिक मक्याचे पीक पाण्याअभावी करपून गेले.
शासनाच्या पीक विम्यासाठी 'अनंत' अडचणी...
माने यांनी पीक विमाही भरला होता. पण शासनाच्या ब्रिटिशकालीन अटीमुळे माने यांना त्याचा लाभ मिळू शकत नाही. कारण माने यांच्या गावाची आणेवारी ही ५० पैशापेक्षा अधिक आहे. परिणामी नुकसान भरपाई मिळण्यास अडचण निर्माण होते. अशा त्यांनी एक-ना अनेक अडचणींचा सामना करत माने आपली शेती बहरेल या अपेक्षेने दुष्काळाशी लढत आहेत.
दुग्धव्यवसायातून कुटुंबाचा 'गाढा' सुरू -
संसाराचा गाडा हाकण्यासाठी प्रसंगी दुसऱ्यांच्या शेतात रोजंदारीवर जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो, तर संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी माने यांच्या पत्नी मंगल ही हातभार लावतात. घरी शेळी, गाय यांच्या पालन करत दूध विक्रीतून घर चालवण्यासाठी मदत करतात. पण, अशात ही त्यांना नातवाच्या आजारपणाचा नवा प्रश्न अधून-मधून निर्माण होत असतो. त्यामुळे हा प्रश्न कसा सोडवायचा या चिंतेत माने कुटुंब आहे.