सांगली - अंडा भुर्जी चालक खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या चार तासात संशयित आरोपींना गजाआड केले आहे. शहरातील विश्रामबाग येथे गजबलेल्या शंभरफुटी रोडवर संतोष पवार या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. गाडी ओव्हरटेक करण्याच्या झालेल्या वादातून कानाखाली लगावण्यात आली होती. त्याच रागातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले ( santosh pawar murder case five accused arrested ) आहे.
अंडा भुर्जी चालकाचा केला खून - विश्रामबाग येथील 100 फुटी रोड वर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय समोर रविवारी ( 29 मे ) अंडा भुर्जी चालक संतोष पवार यांचा निर्घुण खून करण्यात आला होता. अज्ञात हल्लेखोरांनी संतोष पवार याच्यावर हल्ला चढवत धारदार शस्त्राने भोसकून संतोष पवार यांची हत्या करत त्याच्या अंडाभुर्जी गाडीची तोडफोड केली होती. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होतं. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या खून प्रकरणाचा तपास गतीने करत अवघ्या चार तासात पाच संशयित आरोपींना गजाआड केले आहे. आकाश शिंदे (वय 19), वैभव शिंदे (वय 23), निहाल नदाफ (वय 23), अकिब नदाफ (वय 20) आणि सफवान बागवान (वय 21), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.