सांगली :सांगली जिल्ह्यातील झालेल्या घरफोडी आणि चोरीचा तपास सुरू होता. त्यावेळी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला जत शहरातील उमदी-जत रोडवरील सिद्धार्थ पब्लिक स्कूलजवळ दोन रेकॉर्डवरील संशयित सोलापूरला चोरीतला मुद्देमाल विक्री करण्यास जाण्यासाठी थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला. त्यात किशन ऊर्फ कल्लाप्पा ऊर्फ फांगऱ्या, रतन चव्हाण आणि सुरेश तुळशीराम चव्हाण यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता किशन ऊर्फ कल्लाप्पा याचे पॅन्टच्या खिशात सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, सोन्याचे गंठण, लहान सोन्याच्या अंगठ्या मिळाल्या. तसेच सुरेश चव्हाण याच्या अंगझडतीमध्ये पॅन्टच्या खिशात सोन्याचे कानातील टॉप्स, एक जोड, दोन अंगठ्या मिळाल्या.
सोन्याचे दागिने लुटल्याची कबुली :त्यानंतर दोघांची चौकशी केली. तेव्हा दोघांनीही सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर या दोघांचीही सखोल चौकशी केली असता, त्या दोघांनीही सोन्याचे दागिने चोरले असल्याची कबुली दिली. यामध्ये किशन ऊर्फ कल्लाप्पा ऊर्फ फांगऱ्या रतन चव्हाण आणि सुरेश तुळशीराम चव्हाण व अन्य एक साथीदार, असे तिघांनी मिळून कवठे महांकाळ, जत आणि उमदी या ठिकाणी बंद घरांची कुलप तोडून घरफोडी करत सोन्याचे दागिने लुटल्याची कबुली दिली.