सांगली - कुपवाड येथील एका तरुणाच्या खुनाप्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. या खटल्यातील फितूर साक्षीदारावर न्यायालयाने फौजदारी कारवाईची आदेश दिले आहेत. एका मुलीच्या छेडछाडीतून साजन रमेश सरोदे या तरुणाचा खून झाल्याची घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती.
खटल्याबाबत माहिती देताना सरकारी वकील पाच जणांनी मिळून केला होता तरुणाचा खून -
कुपवाड शहरातील भारत सूतगिरणी याठिकाणी 19 जानेवारी 2016ला साजन रमेश सरोदे (वय 24, रा.कुपवाड) या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. प्रत्यक्षदर्शी कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्याने या खुनाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी सखोल तपास करत या खून प्रकरणी गजानन प्रकाश गवळी (वय-२८ वर्षे, रा.उल्हासनगर, कुपवाड) बंडया उर्फ नरसगोंडा आदगोंडा चिंचवाडे (वय ३२, रा. उल्हासनगर, कुपवाड), हणमंत आनंदा कांबळे (वय-२४, रा. उल्हासनगर, कुपवाड), आप्पा उर्फ सिताराम पांडूरंग मोरे (वय-२४, रा.कापसे प्लॉट, कुपवाड) व मौला अब्दुल मुल्ला (वय-३०, रा. कापसे प्लॉट, कुपवाड) या पाच जणांना अटक केली होती. मुलीच्या छेडछाडीच्या करणातून साजन सरोदे याचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले.
एकाच वेळी पाच जणांना जन्मठेप -
या खून प्रकरणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात बुधवारी सुनावणी पार पडली. ज्यामध्ये पाच जणांच्या विरोधात असणारे परिस्थितीजन सबळ पुरावे व 14 साक्षीदारांची साक्ष याआधारे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी आरोपी गजानन प्रकाश गवळी, बंडया उर्फ नरसगोंडा आदगोंडा चिंचवाडे, हणमंत आनंदा कांबळे, आप्पा उर्फ सिताराम पांडूरंग मोरे आणि मौला
अब्दुल मुल्ला यांना भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये दोषी धरून सश्रम कारावासाची जन्मठेप व प्रत्येकी रक्कम रुपये २५ हजार दंड, दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा सुनावली आहे. सांगली जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर एकाच वेळी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.
फितूर साक्षीदारावर फौजदारीचे आदेश -
या खटल्यात एका फितूर साक्षीदाराने खोटे पुरावे सादर केले. त्याची गंभीर दखल घेत, फितूर साक्षीदार ओमकार जाधव याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. यामुळे फितूर साक्षीदारांना धडा मिळाला आहे. या खटल्याचे काम सरकारी पक्षाकडून वकील विनायक मधुकर तथा बाळासाहेब देशपांडे यांनी पाहिले.