सांगली -जिल्ह्यातील विधान परिषदेच्या भाजप आमदारांना जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या बैठकीला बोलवले नसल्याचा प्रकार घडला. याबाबत भाजपच्या आमदारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत, आम्ही फॉरेनवरून आलो आहोत का ? असा संतप्त सवाल करत पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावर मंत्री जयंत पाटलांनी आम्ही जनतेतून निवडून आलेल्या आमदारांना बोलवले आहे, असे उपरोधिक स्पष्टीकरण दिले. तर पालकमंत्र्यांचे कट्टर विरोधक असल्याने त्यांना बैठकीपासून दूर ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सांगली लॉकडाऊन बैठक, विधान परिषद आमदारांना निमंत्रणच नाही सांगली जिल्ह्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आज सोमवारी लॉकडाउन बाबतची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली, यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी जिल्ह्यातील खासदार आणि आमदार उपस्थित होते. मात्र, या बैठकीला जिल्ह्यातल्या विधान परिषदेच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. सांगली जिल्ह्यामध्ये माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे भाजपचे दोन विधान परिषद सदस्य आहेत. मात्र, या दोन्ही विधान परिषदेच्या आमदारांना जिल्हा प्रशासनाने या बैठकीला बोलावले नसल्याचं आमदार खोत पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. यावरून या दोन्ही आमदारांनी प्रशासनासह पालकमंत्री असणाऱ्या जयंत पाटलांवर जोरदार निशाणा साधला.
आम्ही फॉरेनवरून आलोय ..माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बोलताना प्रशासनाने आज बैठक घेतली याची आपल्याला कोणतीही कल्पना नाही.आपण या ठिकाणी दुधाच्या बाबतीत निवेदन देण्यासाठी आलो होतो, त्यावेळी ही बैठक असल्याचे आम्हाला कळाले. जिल्हा प्रशासनाकडून या बैठकीसाठी आम्हाला कोणतेही निमंत्रण देण्यात आले नाही. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या बैठकीला फक्त विधानसभेच्या आमदार खासदारांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, आम्ही विधान परिषदेवर निवडून गेलेलो आहोत. त्यामुळे आम्ही परदेशातून या ठिकाणी आलेले असल्याने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना कदाचित हिंदुस्तानमधील लोकांच्या प्रश्नासाठी परदेशी लोकांची काय गरज असं वाटल्याने त्यांनी आम्हाला बोलवलं नसेल,असा उपरोधिक टोला आमदार खोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जयंत पाटलांना लगावला आहे.
जयंत पाटील म्हणजे तज्ञ, विद्वान आणि पंडित...आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना जयंत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. मंत्री जयंत पाटील हे तज्ञ, विद्वान आणि पंडित आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांने सल्ला देणे योग्य वाटत नसावे,असा टोला आमदार गोपिचंद पडळकर यांनी लगावला. तसेच जयंत पाटील यांना जाणीव असायला पाहिजे की त्यांना एक लाख मतांनी लोकांनी निवडून दिलेले आहे. मात्र, आम्हाला लाख लोकांनी निवडून दिलेल्या विधानसभेच्या ३० आमदारांनी निवडून दिले आहे. कोरोनाच्या संकटात जयंत पाटलांनी विधान सभा आमदार विधान परिषद आमदार अशी तफावत करायला नको पाहिजे. पण जयंत पाटलांच्या मध्ये ते धारिष्ट्य नसावे की विरोधी आमदारांना बैठकीला बोलवायचे. पण कोरोना पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी राजकारण करायला नको होते, तशी गरज नव्हती,असे मत आमदार पडळकर यांनी व्यक्त केले.
ते लोकांच्यामधून निवडून आले नाहीत .!तर मंत्री जयंत पाटील यांना विधान परिषद आमदारांना न बोलवण्याबाबत विचारले असता, त्यांनी याला उपरोधिक उत्तर दिले आहे. लोकांच्यामधून निवडून आलेले विधानसभा आमदार यांना लोकांचा अंदाज असतो, जे विधान परिषदेचे दोन आमदार आहेत. ते राज्याच्या विधानसभेतून निवडून आले आहेत. कोरोना बाबतीत लवकर निर्णय घेण्यासाठी आम्ही विधानसभा आमदारांनी बोलावले. मात्र, त्या दोन विधान परिषदेच्या आमदारांकडून फोन वरून मत घेतले जाईल,असे स्पष्टीकरण देत बगल दिले.भाजपाच्या विधान परिषदेची हे जिल्ह्यातील दोन नेते जयंत पाटलांचे कट्टर विरोधक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सांगली मधील पूर संदर्भातल्या बैठकीमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि मंत्री जयंत पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला त्यांना दूर ठेवण्यासाठी बोलावले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या बाबतीत होणाऱ्या प्रशासनाच्या बैठकीला विधान परिषदेच्या आमदारांना दूर ठेवणे योग्य आहे, का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.