सांगली -खेळाचे राजकारण करणारे पंतप्रधान आम्ही पहिल्यांदा पाहिले, असून खालच्या पातळीवर जाऊन त्यांचे राजकारण सुरू असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी केली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या घटनेचा निषेध म्हणून सांगलीमध्ये महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. स्मशानभूमीला नरेंद्र मोदींचे नाव द्यावे, अशी आमची मागणी असल्याचेही यावेळी सव्वालाखे यांनी स्पष्ट केले आहे.
नाव बदलल्याने निषेध
केंद्र सरकारच्या वतीने क्रीडा क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. राजीव गांधी यांचे नाव बदलून ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. शहरातील काँग्रेस कमिटीसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
'पंतप्रधानपदाची गनीमा गमावली'
त्या म्हणाल्या, की ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे, याचे आम्ही स्वागत करतो. आम्ही काँग्रेस पक्षाचे लोक आहोत. कधी खालच्या पातळीचे राजकारण करत नाही. मात्र पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधानपदाची गनीमा गमावली आहे. कारण खेळाचे राजकारण करणारे पंतप्रधान आम्ही पहिल्यांदाच पाहिले आहेत. त्यांनी ध्यानचंद यांच्या नावाने जो पुरस्कार जाहीर केला, त्याला आमचा विरोध नाही, पण त्यांच्या नावाने ते आणखी काही करू शकले असते.
'मग स्मशानभूमीला मोदींचे नाव'
देशामध्ये आज भयंकर परिस्थिती आहे. महामारी आहे, महापूर आहे, महिलांवर प्रचंड अत्याचार होत आहेत. अशा या परिस्थितीमध्ये त्यावर नरेंद्र मोदी कोणतेच भाष्य करत नाहीत. पुराच्या बाबतीत महाराष्ट्राला अद्याप कोणती मदत जाहीर केली नाही. मात्र नाव बदलण्यासाठी हिरिरिने सहभाग घेत आहेत आणि सांगता आहेत, की देशातील जनतेच्या मनातली भावना होती म्हणून नाव बदलण्यात आले. मग आता आमच्या देशातील महिलांची मागणी आहे, की अमुक एका स्मशानभूमीला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात यावे. मग बघू त्या स्मशानभूमीला आपले नाव देतात का, अशा शब्दांत सव्वालाखे यांनी टीका केली आहे.