सांगली - कृष्णा नदीपात्रात आयर्विन पुलावरून उड्या टाकल्यास गुन्हे दाखल करू, असा इशारा महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. पाण्याची पातळी वाढू लागल्याने आयर्विन पुलावरून काही हौशी जलतरणपटू उड्या मारत असल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कृष्णा नदीच्या काठावर जाऊन पाहणी केली. तसेच, नदीपात्रात विनाकारण फिरणाऱ्या बोटींवरही बंदी घातली आहे.
पुलावरून उड्या मारल्यास दाखल होणार गुन्हा
संततधार पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. झपाट्याने पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये काही हौशी जलतरणपटू शहरातल्या आयर्विन पुलावरून थेट कृष्णा नदीच्या पात्रात उड्या मारत असल्याचा प्रकार समोर आला. सोशल मीडियावर एका तरुणाकडून आयर्विन पुलावरून नदीपात्रात उडी मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकाराची सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. थेट कृष्णा नदीच्या काठी जाऊन नितीन कापडणीस यांनी पाहणी केली. तसेच 'आयर्विन पुलावरून जर कोणी नदीपात्रात उड्या मारत असतील तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील', असा इशाराही नितीन कापडणीस यांनी दिला आहे.