सांगली - इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये सापडलेल्या खुर्च्यांची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. तासगावच्या सावळज येथील बाळू लोखंडे या मंडपवाल्याच्या या खुर्च्या मॅन्चेस्टरमधील एका हॉटेलबाहेर अगदी थाटात बसण्यासाठी वापरल्या जात आहेत. मात्र, खुर्च्या तिथे पोहोचल्या कशा? याबाबतही आता कुतूहल निर्माण झाले आहे.
हेही वाचा -सांगलीचा पूर लागला ओसरू.. आता 'मिशन शहर स्वच्छ', सांगलीसह 5 पालिकांची स्वछता पथके ऑन फिल्ड
इंग्लंडमध्ये थेट सांगलीच्या खुर्च्या
इंग्लंडमधील मॅन्चेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर काही लोखंडी खुर्च्या क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांना आढळून आल्या. या लोखंडी खुर्च्यांवर 'बाळू लोखंडे, सावळज'असे लिहले आहे. त्यामुळे, लेले यांना चकचकीत हॉटेल बाहेर आपल्या भारतातल्या आणि तेही महाराष्ट्रातील खुर्च्या कश्या पोहोचल्या ? या बद्दल आश्चर्य वाटले आणि याबद्दल लेले यांनी एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नेटकरामध्ये या खुर्च्यांबद्दल खूपच उत्सुकता निर्माण झाली. मग त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांवर तुफान व्हायरल केला. भारतातल्या लोखंडी खुर्च्या, जुन्या ते सोने, दुर्मिळ म्हणून बसण्यासाठी परदेशी नागरिक या खुर्च्या वापरत आहेत, अशा अनेक पद्धतीचे कमेंट्स केल्या.
बाळू लोखंडे म्हणतात आश्चर्यम
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज येथील बाळू लोखंडे या मंडप डेकोरेशन करणाऱ्या व्यक्तीच्या असणाऱ्या या खुर्च्या थेट लंडनमध्ये कशा पोहोचल्या? याबाबत अनेक तर्कवितर्क आणि आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबत बाळू लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले. खुर्च्या लंडनमध्ये कश्या पोहोचल्या याची बाळू लोखंडे यांनाही कल्पना नाही.