सांगली - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा उद्घाटनावरून सांगलीतले वातावरण चांगलेच तापले आहे. परंतु स्मारक परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, उद्घाटन करणारच अशी भूमिका घेऊन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह नगरसेवक आणि धनगर समाज बांधव स्मारकाच्या ठिकाणाकडे भव्य अशी रॅली द्वारे ढोल- ताश्यांच्या गजरात निघाले आहेत.
Gopichand Padalkar : अहिल्यादेवींच्या स्मारकावरून सांगलीत वातावरण तापले.. उद्घाटनाला निघालेल्या पडळकरांना अडवले - आमदार सदाभाऊ खोत
सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकावरून राजकीय वातावरण तापले ( Ahilyabai Holkar memorial inauguration ) आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या ( NCP Chief Sharad Pawar ) हस्ते उद्घाटन ठरले असताना भाजप नेते गोपीचंद पाडळकरांनी ( BJP Leader Gopichand Padalkar ) मेंढपाळांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. उद्घाटनाला निघालेल्या गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी कार्यक्रमस्थळी जाण्यापासून अडवले आहे.
चांगल्या कामाला पोलिसांनी रोखू नये : काही वेळातच दिलेल्या डेडलाईननुसार उद्घाटन होणार, असा निर्धार आमदार पडळकरांनी व्यक्त केला. पोलिसांनी प्रस्थापित नेत्यांच्या दबावाला बळी न पडता चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लवण्याचे काम करू नये, असा इशारा दिला आहे. तसेच काही वेळात अहिल्यादेवी यांच्या स्मारकाचे उद्घाटन होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, संचारबंदी आणि प्रचंड पोलीस बंदोबस्त असताना हा उद्घाटन सोहळा कसा होणार? पोलीस भाजपा नेत्यांना कसे रोखणार? काय परिस्थिती निर्माण होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
काय आहे वाद ? :सांगली शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादीकडून 3 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा जाहीर करण्यात आला आहे. तर भाजपाने याला विरोध करत27 मार्च रविवारी उद्घाटन होणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरामध्ये संचारबंदी लागू करत प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळपासून परिसर सील करत स्मारककडे जाणारे सर्व मार्ग बंद करून नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच स्मारक परिसरात प्रसारमाध्यमांना देखील जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.