सांगली - कृषी कायद्या विरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. देशभरातून या आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. या पार्श्वभुमीवर सांगलीमध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आहेत. हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर आंदोलन-
या शेतकरी आंदोलनाला भाजपा वगळता इतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून ही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीकडून कृषी कायद्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी केंद्र सरकारने तातडीने शेतकर्यांच्या मागण्यांचा विचार करावा आणि कृषी कायदे रद्द करावेत,अशी मागणी करण्यात आली.
शेतकरी उध्वस्त करणारे कायदे-
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहर अध्यक्ष राजेश गाईगावळे म्हणाले, केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आहेत. आधीच कोरोना, महापूर,अतिवृष्टी आणि दुष्काळ या चक्रामध्ये शेतकरी अडकलेला आहे. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांवर लादण्यात येत असलेल्या अन्यायकारक कायद्यामुळे शेतकरी पुरता संपून जाईल. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कडून शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे.
हेही वाचा-'मुथुट फायनान्स'मध्ये दरोडा.. वर्ध्यातील बँक व्यवस्थापनाला गुंगारा