सांगली - वादग्रस्त वक्तव्य करण्याची परंपरा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कायम ठेवली असून कोरोनावरून त्यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केले आहे. प्रजा बावळट असून कोरोना अस्तित्वात नाही. ज्याला जगायचे असेल तो जगेल, ज्याला मारायचे असेल तो मरेल, पण सरकारने यात लक्ष घालू नये, असा सल्ला दिला. कोरोनाच्या नावाखाली देशात खेळखंडोबा सुरू असल्याची टीका भिडे यांनी केली आहे, ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मास्कबाबत बोलताना कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचे सिद्धांत काढला आहे, मास्क लावण्याची गरज नाही. तसेच मास्क नसला की पोलीस काठ्या मारतात हा मूर्खपणा आहे. तसेच कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा सुरू आहे. कोरोनाबाबत केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असून प्रत्येकाला आपल्या जिवाची काळजी असून जे जगायचे ते जागतील. जे मारायचे ते मारतील, असे मत भिडे यांनी व्यक्त केले.
गांधीच्या आदर्शाने कोरोना वाढणार...
कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. नोटावरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील. केवळ कोरोना-कोरोना आक्रोश चालले आहे. कोरोना अस्तित्वात नाही. त्यामुळे-लॉकडाऊनची गरज नाही. यामुळे सरकारने काही करू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.