सांगली - कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी-दसऱ्याप्रमाणे साजरा करावा असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. तसेच मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणच्या मूर्त्यांना मिश्या असाव्यात अशी विनंती भिडे यांनी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निमंत्रण नसेल तरी आयोध्याला जावे, असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला आहे. ते आज सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
संभाजी भिडे - अध्यक्ष, शिवप्रतिष्ठान संघटना कोरोनाला न घाबरता दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे हा सोहळा साजरा करा
५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आयोध्यातील राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याबाबत सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ५०० वर्षांपासून अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न सुरु होता. आता तो साकारला जात आहे. ही देशातील तमाम हिंदू समाजासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे देशातील हिंदू समाजाने सध्या कोरोनाची परिस्थिती असली तरी कोरोनाला न घाबरता दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे हा सोहळा साजरा करावा, तसेच प्रत्येकाने यानिमिताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनही करावे असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले.
निमंत्रण नसले तरी पवारांनी अयोध्येला जावे
यावेळी बोलताना भिडे यांनी शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाला केलेल्या विरोधावरून निशाणा साधला. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाने अशा या पवित्र सोहळ्याला विरोध करणे योग्य नाही. तसेच रेल्वे सुरू करून आणि बाकीच्या गोष्टी करून कोरोना जाणार आहे का ? असा सवाल करत शरद पवारांना जरी निमंत्रण नसले तरी त्यांनी अयोध्याला गेलं पाहिजे असे मत भिडे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अत्यंत चांगले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्यांनी आता महाराष्ट्रभर फिरून कोरोनाच्या बाबतीत जनतेमध्ये असणारे भीती दूर करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिवसैनिकांनी ऑनलाईन राम भूमिपूजन करण्याच्या केलेल्या मागणीबाबत बोलताना भिडे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आवडले नसते. बाबरी मशीद पडण्यात शिवसैनिकांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे निमंत्रण नसले तरी त्यांनी अयोध्येत जाऊन ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी झाले पाहिजे, असे भिडे म्हणाले.
राम हे अतुलनीय आणि स्फूर्ती प्रेरणा देणारे दैवत आहे. पुरुषत्व असणाऱ्या दैवतांची चित्रकारांकडून चुकीच्या प्रतिमा बनवल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपण राम मंदिर उभारणी करणारे गोविंदगिरी महाराज यांना राम मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात अशी विनंती केल्याची माहिती भिडे यांनी दिली.