सांगली- संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनचे कार्यवाहक नितीन चौगुले यांना संघटनेमधून निलंबित करत काढून टाकण्यात आले आहे. शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी या कारवाईची माहिती जाहीर केली. दरम्यान आपल्याला कोणतीही कल्पना देण्यात आली नसून निलंबनाचे स्पष्टीकरण मागितले आहे, त्यानंतर पुढील चार दिवसात आपली पुढील भूमिका स्पष्ट करू असं चौगुले यांनी स्पष्ट केले आहे. मात्र यामुळे संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान मध्ये उभी फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान संघटनेत उभी फूट? कार्यवाहक चौगुले निलंबित - संभाजी भिडे गुरुजी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक असणारे नितीन चौगुले यांना शिवप्रतिष्ठान मधून निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे जाहीर केले.
राष्ट्रवादीचे सध्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सांगलीत झालेल्या हल्ल्यामध्ये नितीन चौगले हे सर्वात पुढे होते. तसेच गेल्या काही वर्षांपासून शिवप्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यात नितीन चौगुले यांचा अग्रभाग राहिला आहे. दोन दिवसांपूर्वीच नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रतिष्ठानच्या वतीने शर्जील उस्मान याच्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते.
चौगुले समर्थकांनी घेतली देसाईंची भेट..
या निलंबन कारवाई बाबत नितीन चौगुले यांच्या समर्थकांनी कोणत्याही प्रकारचे कारवाईचे कारण स्पष्ट न करता थेट सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून निलंबन करण्यात आल्याचं आम्हाला कळाले. मात्र, ही कारवाई का करण्यात आली? याचे कारण समजू शकले नसल्याचे म्हणत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे रावसाहेब देसाई यांची शिरोळ येथे भेट घेतली. त्यावर या निलंबनाच्या कारवाईबाबत येत्या दोन दिवसात पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती रावसाहेब देसाई यांच्याकडून देण्यात आली. तसेच रावसाहेब देसाई आणि संभाजी भिडे गुरुजी यांची याबाबत चर्चा सुरू असल्याचेही चौगुले यांच्या समर्थकांनी सांगितले.
निलंबनाचे कारण अपेक्षित..
तर या निलंबनाबाबत नितीन चौगुले यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त करत गेल्या काही दिवसांपासून प्रतिष्ठानच्या बैठकांमधून आपल्याला जाणून बुजून बाजूला ठेवण्यात येत होते. याबाबत आपण संघटनेचे इतर पदाधिकारी व संभाजी भिडे गुरुजींची अनेकदा भेट घेतली. मात्र त्याबाबत कोणतेचं कारण देण्यात आले नाही, आणि 5 फेब्रुवारीला अचानकपणे आपल्याला निलंबित करण्यात आले. या मागचे कारण काही कळू शकलेले नसल्याचे चौघुले म्हणाले. तसेच गेल्या २० वर्षा आपण भगवा ध्वज घेऊन शिवप्रतिष्ठानचे कार्य वाढविण्यासाठीचे काम केले आहे. त्यामुळे आपल्या निलंबनाच्या बाबतीत भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचेही चौगुले यांनी यावेळी स्पष्ट केले. याबाबत भिडे गुरुजी यांच्याशीही संपर्क साधला. पण संपर्क होऊ शकला नाही. मात्र अध्यक्ष देसाई यांनी 4 दिवसात याबाबतीत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनतर आपण आपली पुढील भूमिका स्पष्ट करू,असेही नितीन चौगुले यांनी सांगितले.