महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 7, 2021, 5:38 PM IST

ETV Bharat / state

...तर पहिला राजीनामा माझा असेल - खोत

मराठा समाजाचा इतकाच पुळका असेल तर सत्ताधारी मराठा आमदार, खासदारांनी तारीख ठरवून राज्यपालांकडे राजीनामा द्यावा. पहिला राजीनामा मी देतो अशी टीका महाविकास आघाडीवर सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच सरकार चालवायला जमत नसेल तर केंद्राकडे राज्य द्यावे असेही यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

सांगली -मराठा समाजाचा इतकाच पुळका असेल तर सत्ताधारी मराठा आमदार, खासदारांनी तारीख ठरवून राज्यपालांकडे राजीनामा द्यावा. पहिला राजीनामा मी देतो अशी टीका महाविकास आघाडीवर सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच सरकार चालवायला जमत नसेल तर केंद्राकडे राज्य द्यावे असेही यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. येत्या 10 मेला रयत क्रांती संघटना मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली, ते सांगलीत बोलत होते.

'बिगर मराठा मुख्यमंत्रीच आरक्षण देऊ शकतो'

मराठा आरक्षण रद्दच्या निर्णयावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरक्षणसाठी आता राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल, तर तो बिगर मराठा मुख्यमंत्रीच देऊ शकतो. असं यावेळी खोत यांनी म्हटले आहे.

'...तर माझा पहिला राजीनामा असेल'

यावेळी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना खोत यांनी म्हटले आहे की, जर महाविकास आघाडीतील नेत्यांना खरोखरच मराठ्यांना आरक्षण मिळावे वाटत असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत सत्तेत येणार नाही अशी भूमिका घ्यावी असे झाल्यास पहिला राजीनामा माझा असेल.

'मलिक तर राष्ट्रवादीचे गुलाम'

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून भाजपावर करण्यात येणाऱ्या टिकेवरून आमदार खोत यांनी जोरदार पलटवार केला आहे. मराठा आरक्षणावर ते सातत्याने भाष्य करत आहेत, मलिक यांना मला विचारायचं की पंधरा वर्ष तुमचं सरकार राज्यामध्ये होतं, त्यावेळी तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही ? नवाब मलिक मला जाणीव आहे, तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम आहात, आणि गुलामाच्या बोलण्याला फारसं महत्त्व असत नाही, त्यामुळे तुम्हाला आम्ही गांभीर्याने घेत नाही, परंतु मराठा समाजामध्ये दुही निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असाल तर मराठा समाज हा लढावू आहे. जी गोष्ट त्याला मिळत नाही, ते ती गोष्ट लढाई करून मिळवतो, असेही खोत यांनी यावेळी म्हटले आहे.

...तर पहिला राजीनामा माझा असेल

जमत नसेल तर राज्य केंद्राकडे द्या

मला मुख्यमंत्र्यांची आता दया येते, केंद्राकडे बोट दाखवत त्यांनी केंद्राला हात जोडलेले आहेत. 370 कलम रद्द केलं, त्या पद्धतीने मराठ्यांना आरक्षण द्या, इथे काय कलम लागलंय का ? असा सवाल करत, कोरोना स्थिती केंद्राकडे बोट, व्हेंटिलेटर केंद्राकडे बोट, लस केंद्राकडे बोट, आरक्षण केंद्राकडे बोट, मग राज्याला सरकार चालवायला जमत नसेल, तर काही दिवस केंद्राकडे राज्य चालवायला द्या असेही यावेळी खोत म्हणाले आहेत.

'मराठा सरदारांना फडणवीस चाबकाने फोडत होते'

तुम्ही क्रिकेट प्रमाणे रनर ठेवून जर फक्त वसुली करणार असाल, तर तुमच्यासाठी कोण रनर म्हणून येईल? दुसऱ्याने पळायचे आणि तुम्ही वसुली करायची, असं होत नाही. त्यामुळे आता तुम्हाला झोकून काम करावा लागेल, आता रणांगणातून पळ काढता येणार नाही. मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण आता सगळे मराठी सरदार मुख्यमंत्री साहेब तुमच्या दावणीला आहेत, आता त्या सरदारांना घ्या आणि कामाला लावा. देवेंद्र फडणवीस एकमेव माणूस होता, तो या मराठा सरदारांना चाबकानं फोडून काढत होता. म्हणून हे सगळे सरदार घाबरून एक झाले आणि तुमच्या वळचणीला आले व सत्ता स्थापन केली. म्हणून आता या मराठा सरदारांना सांगा, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्यावेळी हे सगळे सरदार तुमच्या पायाला येऊन बसतील, असा टोला यावेळी खोत यांनी लगावला आहे.

10 मे रोजी राज्यभर आंदोलन

मराठा आरक्षण लढा तीव्र करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, राज्य सरकारच्या विरोधात 10 मे रोजी रयत क्रांती संघटना राज्यभर आंदोलन करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले आहे. स्वतःच्या अंगणात मराठा समाजाची मुलं महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतील, माझा अंगण हेच आंदोलन असं हे आंदोलन असेल. ज्याचे घोषवाक्य असेल,"मराठा समाजाच्या पोरांचा आरक्षण बांधलं काठीला, सरकार गेलं काशीला" अशा आशयाचे फलक आणि काठीला पुस्तका अडकून हे आंदोलन केलं जाईल अशी माहिती यावेळी खोत यांनी दिली.

हेही वाचा -ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन

ABOUT THE AUTHOR

...view details