सांगली-माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वतःच्या आमदार फंडातून इस्लामपूरमध्ये 20 बेडचे फिरते क्वारंटाइन सेंटर सुरु केले आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन क्वारंटाइन सेंटरची सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आमदार फंडातून सुरु करण्यात आलेले हे राज्यातील पहिलेच क्वारंटाइन सेंटर आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस आढळून येत आहेत.त्यामुळे जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी असणाऱ्या कोरोना रुग्णालयावर मोठा ताण पडत आहे. मोठया संख्येने कोरोना संशयित रुग्णांना क्वारंटाइन सेंटरची कमतरता जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर याठिकाणी 20 बेडचे क्वारंटाइन सेंटर सुरु केले आहे.
आमदार फंडाच्या माध्यमातून हे क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले आहे. महाराष्ट्रातला हा पहिलाच उपक्रम सदाभाऊ खोत यांनी सुरु केला आहे.इस्लामपूर या ठिकाणी असणाऱ्या समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत याचे उद्गाटन करण्यात आले. जे कोरोना संशयित व्यक्ती येथे दाखल होतील त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध सामग्री आणि वस्तू सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.दात घासायच्या ब्रश पासून औषधं पर्यंत सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही सर्व साधनसामुग्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.