सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी नेते सदाभाऊ खोत यांनी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना साद घातली आहे. राजू शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यास रस्त्यावर उतरले, तर सदाभाऊ खोत निश्चितपणाने त्यांच्या खांद्याला खांदा लावेल, असे ते म्हणाले. राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नाही, असे वक्तव्य करत त्यांनी भाजपावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
राजू शेट्टींनी लुटारूंची संगत सोडली, तर निश्चितपणाने राजू शेट्टींसोबत काम करण्यास तयार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी एकत्र काम करणारे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांमधील वाद चव्हाट्यावर आले. यातून सदाभाऊ खोत यांनी भाजपाचा रस्ता धरला, तर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबतच राहण्याचे ठरवले. यानंतर दोघांमधील वाद काहीना काही कारणांनी बाहेर येत होते. मात्र आता खोत यांनी राजू शेट्टींना साद घातली आहे. राज्यातील साखर सम्राटांविरोधात दंड थोपटत त्यांनी शेट्टी यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
भविष्काळात शेतकऱ्यांच्या, उसाच्या प्रश्नांवर माझे आणि राजू शेट्टींचे एकमत होत असेल, तर एकत्रितपणे साखर सम्राटांच्या विरोधात उभे राहू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.