सांगली - नाभिक समाजाला राज्य सरकारकडून मदत मिळावी या मागणीसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली थेट सलून व्यावसायिकांनी आंदोलन केले. इस्लामपूरमध्ये सलून पार्लरसमोर राज्य सरकारच्या लॉकडाऊनला विरोध करत 50 हजार रुपये आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली.
माहिती देताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही वाचा -सांगली जिल्ह्यात ठप्प झालेली लसीकरण मोहीम सुरू; 66 हजार लसी दाखल
माजी मंत्री सलून व्यावसायिकांसाठी रस्त्यावर
राष्ट्रीय नाभिक संघटना आणि रयत क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नाभिक बांधवांच्या व्यथा सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी सांगलीच्या इस्लामपूर येथील सलून पार्लर समोर उभे राहून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मागण्यांचे फलक हातात धरून घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
50 हजारांची आर्थिक मदत द्या
कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यातील अनेक सलून व्यावसायिकांनी आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या नाभिक बांधवांना सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. आता सरकारने पुन्हा लॉकडाऊन केल्यामुळे सलून दुकाने उघडता येत नाही. अनेक नाभिक बांधवांची दुकाने भाड्याने आहेत. त्याचे भाडे, वीजबिल त्यांच्या अंगावर आले आहे. जर सरकारला दुकाने बंद ठेवायची असतील तर सलून व्यावसायिकांना सरकारने प्रति महिना 50 हजार रुपये मदत देऊन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी. जर सरकार त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणार नसेल, तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.
हेही वाचा -सांगलीत पीक विम्याच्या जाचक निकषामुळे शेतकरी चिंतातुर