सांगली - कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजयी व्हायचे असेल, तर रयत क्रांती संघटनेलाच जागा सोडावी लागेल, असा दावा कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केला आहे. या जागेबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून ती जागा रयत क्रांतीला मिळेल, असे मत खोत यांनी व्यक्त केले आहे. युतीबाबत आपण नाराज नसून घटक पक्षाला विचारात घेऊन भाजप निर्णय घेत असल्याचाही दावा खोत यांनी केला. ते आज सांगलीमध्ये बोलत होते.
सदाभाऊ खोत आपली भूमिका मांडताना राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली आणि त्या युतीनंतर भाजपच्या घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी याबाबत आपण नाराज नसल्याचे म्हटले आहे. कोल्हापूरचा हातकणंगले मतदारसंघ मागील वेळी शिवसेनेने लढवला होता. त्यामुळे ती जागा शिवसेनेला जाणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे या चर्चेमुळे भाजपचे घटक पक्ष असणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत नाराज असल्याची चर्चाही सुरू होती. यावर आज खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
गेल्या साडेतीन वर्षांपासून या मतदारसंघात आपण मंत्रीपदाच्या माध्यमातून भरघोस विकास कामे केली आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आपण निवडणूक लढवावी अशी आहे. राज्याच्या युतीचा जो फॉर्मुला ठरला आहे, त्यामध्ये शिवसेना आणि भाजपचे उमेदवार पराभूत झालेल्या मतदार संघात अदला-बदल होण्याची शक्यता आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत व्हायची असेल आणि ही जागा जिंकायची असेल, तर ही जागा रयत क्रांती संघटनेला मिळाली पाहिजे, अशी मागणी खोत यांनी केली. याद्वारे खोत यांनी अप्रत्यक्षपणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत आपण आग्रही असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच ही जागा रयत क्रांती संघटनेला सोडावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असून मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील आणि रयत क्रांती संघटनेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा सोडतील, असाही विश्वास खोत यांनी व्यक्त केला.
घटक पक्षांचे नेते हे भाजपसोबतच आहेत आणि ते भाजपच्या युतीवर नाराज नाही, असेही स्पष्टीकरण खोत यांनी यावेळी दिले. मंत्री सदाभाऊ खोत यांनी अप्रत्यक्षपणे हातकणंगले मतदारसंघातून आपण लढणार असल्याचे संकेत देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरुद्ध रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत अशी लढत होणार असल्याचे संकेत यावेळी दिले आहेत. आता शिवसेना-भाजपची युती हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.