सांगली -राज्यात सध्या ठोकशाही आणि दादागिरी पध्दतीने सरकारचे काम चालू आहे, अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. तसेच आरोग्य व्यवस्थेसंदर्भात व्यवसाय असणाऱ्या व्यवसायिकांना संरक्षण द्यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. खोत यांनी अदर पुनावाला यांना देण्यात आलेल्या धमकीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.
राज्यासह सांगली जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीवरून खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. अदर पुनावाला यांना देण्यात आलेल्या धमकीवर बोलताना खेत म्हणाले की, अदर पुनावाला यांना कोणी धमकी दिली, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. मात्र राज्यातील एका उद्योजकाने पुढाकार घेऊन, कोरोनावरील लस शोधून काढली आहे. या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोनापासून आपला बचाव होणार आहे, अशा उद्योजकाला धमकी देणे हे दुर्दैवी आहे. जर अशा उद्योजकांना धमक्या देण्यात येत असतील, तर महाविकास आघडी सरकारने एक लक्षात ठेवावे, ज्या पद्धतीने रोजगाराच्या शोधात परराज्यातील नागरिक महाराष्ट्रात येतात, तसेच इकडचे उद्योजक महाराष्ट्र सोडून इतर राज्यात गेल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे अदर पुनावाला यांना तातडीने संरक्षण मिळाले पाहिजे असं देखील यावेळी खोत यांनी म्हटले आहे.