सांगली - राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे नाटक असून, हे दूध आंदोलन मॅच फिक्सिंगसारखी दूध फिक्सिंग असल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच बारामतीला आमदार होण्यासाठी जातात पण दुधाच्या दरासाठी जाणे जमत नाही, असा टोलाही खोत यांनी राजू शेट्टींनी लगावला आहे. ते सांगली येथे पत्रकारांसोबत बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दर मागणीसाठी २१ जुलै रोजी राज्यभर दूध बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर या दूध आंदोलनावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा -राम मंदिर बांधून कोरोना महामारी जाणार नाही; त्यासाठी उपाययोजना महत्वाच्या : शरद पवार
राज्य शासनाकडून दूधबाबत २१ जुलै रोजी बैठक घेण्यात येत असून १६ जुलै रोजी दुग्ध विकास विभागाकडून सर्व शेतकरी संघटनांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले. राजू शेट्टींनाही याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी २१ रोजी बैठक असताना, त्याच दिवशी दूध आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे शेट्टींचे आंदोलन म्हणजे एखाद्या मॅच फिक्सिंग प्रमाणे दूध फिक्सिंग आंदोलन असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
राजू शेट्टी यांनी खरेतर आंदोलन करायला नाही पाहीजे, कारण ते सरकारमध्ये घटक पक्ष आहेत. राजू शेट्टी आमदारकी मागायला बारामतीमध्ये जातात. मग शरद पवारांकडे दूध दर मागायला जाणे फार अवघड नव्हते, असा टोला लगावला. एका बाजूला सरकारमध्ये राहायचे, सरकारच्या धोरणाला पाठिंबा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन करण्याचे नाटक राजू शेट्टी करत असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.