सांगली - कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामध्ये माझ्या कुटुंबातील कुणी सदस्य असेल, तर टीका करणाऱ्यांनी त्याचे पुरावेद्यावेत. मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टींना दिले आहे. तसेच खोटे आरोप करून राजकीय पोळी भाजणे बंद करा, असा इशाराही त्यांनी शेट्टी यांना दिला आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात जुंपली आहे. नुकतेच कडकनाथ कोंबडी घोटाळ्यावरून शेट्टी यांनी खोत यांच्या मुलावर आरोप केले होते. या आरोपावरून खोत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा - 'उसाच्या एफआरपीबाबत 28 जानेवारीला निर्णय'
यावेळी ते म्हणाले, कडकनाथमध्ये नुकसान झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली, ही वाईट घटना आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे पण शेतकऱ्यांच्या या फसवणुकीवरून काहीजण राजकारण करत आहेत. राजू शेट्टी हे त्यातीलच एक असून ते महाविकास आघाडीत कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने वैफल्यग्रस्त आहेत. कॅबिनेट ऐवजी राज्यमंत्री देण्यात येत होते. मात्र, शेट्टी यांना कॅबिनेट हवे होते आणि ते मिळाले नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन आंदोलन करू लागले आहेत, असा टोला खोत यांनी लगावला.
कडकनाथ प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आपल्या कुटुंबाचा कसलाही त्या प्रकरणाशी संबंध नाही. जे आरोप करत आहेत. त्यांनी पुरावे द्यावेत, मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान खोत यांनी शेट्टींना दिले. तसेच कडकनाथ घोटाळ्यावरून सातत्याने माझ्या कुटुंबावर आरोप होत असतील, तर मी तोंडावर बोट ठेवून गप्प बसणार नाही, असा इशाराही खोत यांनी यावेळी दिला.