सांगली - सचिन पवार हे कोरोना रूग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. ते सांगली, इस्लामपूर येथील सर्व रूग्णालयातील कोरोना रुग्णांना मोफत जेवण देत आहेत. त्यामुळे अवलिया सचिन पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये आपले लोक परके होताना दिसत आहेत. मात्र, सचिन पवारसारखे अवलिया परक्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून त्यांना लढण्यास बळ देत आहेत. यातून अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर त्याच्याकडे बगण्याचा लोकांचा दृष्टीकोनच बदलतो. तर कित्येक नातेवाईकांनी अशा लोकांकडे जाणेही टाळले आहे. मात्र इस्लामपुरातील सचिन पवार व त्यांच्या पत्नी ज्योती पवार यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून रुग्णांसाठी काहीतरी करण्याचे ठरवले.
सध्या कोरोनाच्या रुग्णांना व त्यांच्या सेवेला असणाऱ्या व्यक्तीला जेवणाची गरज असल्याचे ओळखून ज्योती यांनी मोफत जेवणाचे डबे पुरवायचे निश्चित केले. सचिन पवार यांनी आपल्या सुधीर कापूरकर, प्रा. रमेश पाटील, थोर समाजसेवक सुनील शिंदे, रोहन कांबळे या मित्रांबरोबर चर्चा करून जेवणाचे डबे मिळतील, अशी सोशल मीडियावर जाहिरात सुरू केली. त्यानुसार इस्लामपूर येथील शासकीय व खासगी रुग्णालयातील रुग्णांची माहिती घेऊन त्यांना डबे पुरवण्याचे काम सुरू केले. ते रोज 100 डबे पुरवत आहेत. डब्यामध्ये 3 चपात्या 1 अंडे, भात, 2 भाज्या असे उत्कृष्ट जेवण दिले जाते.