सांगली- येथील एका अवलियाच्या नावे तब्बल ७५ पेटंटची नोंद आहे. एकाच्याच नावे एवढे पेटंट असल्याने त्याची लिम्का आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. सचिन लोकापुरे, असे या संशोधकाचे नाव असून भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या संशोधनातून सचिन लोकापुरे यांनी हा बहुमान मिळवत सांगलीच्या शिरपेचात मानाच तुरा रोवला आहे.
वैद्यकीय क्षेत्रात 75 पेटंट नोंदवलेले सचिन लोकापुरे जाणून घ्या कोण आहे सांगलीचा 'फुंगसूक वांगडू' ईटीव्ही भारतचे खास रिपोर्ट : खास व्हिडिओ
भारतात वैद्यकीय क्षेत्रात अनेक रोगांचे सूक्ष्म निदान करण्यासाठी आज पॅथॉलॉजी लॅब गरजेची बनली आहे. हे सूक्ष्म निदान मायक्रोस्कोपीच्या उपकरणाद्वारे केले जाते. मात्र, भारतात असणारे मायक्रोस्कॉपी उपकरणे ही काही प्रमाणात परदेशातून म्हणजेच जपान आणि चीनमधून मागवली जातात. आयात केलेले हे उपकरणे महागडीसुद्धा आहेत. तर याद्वारे अहवाल बनवण्याच्या काही तांत्रिक त्रुटी देखील आहेत. यामुळे सांगलीच्या मिरजेतील सचिन गंगाधर लोकापुरे यांनी संशोधन करत स्वतः भारतीय बनावटीचे मायक्रोस्कॉपीची डिजिटल उपकरणे तयार केली आहेत. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी लोकापुरे यांनी संशोधनाला सुरुवात केली होती. आज 32 व्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोगनिदानात उपयोगात येणारी डिजिटल यंत्रे विकसित केली आहेत. इतकेच नव्हे तर सचिन यांनी याची नोंद सुद्धा भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या नावे तब्बल ७५ पेटंटची नोंद झाली आहे. सचिन लोकापुरे यांनी एम. फार्मसी पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. मायक्रोस्कोपीमध्ये सुलभता आणण्याच्या दृष्टीने आणि भारतीय मायक्रोस्कोपीचे उपकरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आधुनिक डिजिटल उपकरणे बनवली आहेत. त्यांच्या संशोधनातून भारतीय वैद्यकीय क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आहे. शिवाय आपल्या सर्वात जास्त पेंटट मिळवण्याचा बहुमानही मिळाला आहे.
सचिन लोकापुरे यांनी आतापर्यंत तब्बल १७ उत्पादनांची निर्मिती करून या सर्वांची नोंद भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहे. वयाच्या बत्तिसाव्या वर्षी एवढ्या मोठ्या संख्येने पेटंटची नोंद असणारे सचिन भारतातील एकमेव व्यक्ती असल्याचा दावा सचिन लोकापुरे यांनी केला आहे. याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून सर्वाधिक ७५ पेटंट, वैद्यकीय क्षेत्रातल्या रोग निदानमधील मायक्रोस्कोपी मधील असल्याचे कोरले आहे.
पॅथॉलॉजी क्षेत्रांमध्ये हे क्रांतिकारक संशोधन असून विशेष म्हणजे ते भारतात एकमेव असल्याचे सांगलीतील पॅथॉलॉजिस्ट संदीप पाटील यांनी सांगितले. पाटील हे स्वतः सचिन लोकापुरे यांचे संशोधन असलेले उपकरण सध्या वापरत असून त्यामुळे त्यांच्या रोग निदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे.