सांगली - चाकूचा धाक दाखवत एका व्यापाऱ्याला दहा लाखांना लुटण्यात आल्याचा प्रकार घडला. ही घटना मार्केटयार्ड याठिकाणी घडली. मात्र, अवघ्या काही वेळेत पोलिसांनी धावत्या गतीने तपास करत चार जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून लुटण्यात आलेली रक्कमही हस्तगत केली. गजानन इसरडे (वय-28), कृष्णा कांबळे (वय-30), निलेश आडे (वय-26) आणि राकेश कांबळे (वय-25) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सांगलीच्या मार्केटयार्ड या ठिकाणी एका व्यापाऱ्याच्या दुकानात धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. आंनद कुलकर्णी या प्लास्टिक व्यापार्याच्या दुकानामध्ये हा चोरीचा प्रकार घडला होता. चार जणांनी दुकानात शिरून चाकूचा धाक दाखवत 10 लाख 79 हजार रुपये लुटले होते. कुलकर्णी हे आपल्या दुकानात पैसे मोजत असताना हा प्रकार घडला होता. त्यानंतर चोरट्यांनी पलायन केले होतं. या घटनेची माहिती तातडीने आनंद कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलिसांना दिली. पोलिसांनी काही वेळातच लपून बसलेल्या या चोरट्यांना मार्केट यार्डाच्या परिसरात असणाऱ्या स्वस्तिक काटा येथून शिताफीने अटक केली.
हेही वाचा -एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात.. धावत्या कारचा फुटला टायर
500 रुपयांची नोटमुळे मिळाला चोरट्यांचा ठाव-ठिकाणा -
चोरीच्या घटनेनंतर विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी चोर ज्या दिशेने पळून गेले त्या दिशेने तपास सुरू केला. काही अंतरावर स्वस्तिक काटा येथे पोहचले असता त्याठिकाणी रस्त्यावर एका चोरट्याची चप्पल आढळून आली. काही अंतरावर एक 500 रुपयांची नोट आढळून आली. तिथे चोरटे लपून बसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच त्याठिकाणी लपून बसलेल्या चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लुटण्यात आलेली 10 लाख 79 हजारांचा रक्कमही पोलिसांनी ताब्यात घेतली.
मुख्य संशयित सराईत गुन्हेगार -
या प्रकरणी चौघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात, चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील मुख्य संशयित गजानन इरसडे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दरोडे, दोरड्याचे प्रयत्न, चोरी, खुनी हल्ले, असे गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तसेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, कारागृहात तो सध्या जमिनावर सुटला होता. आपल्या साथीदारांसमवेत दरोडा टाकून पळून जाताना तो पोलिसांच्या हाता लागला.