सांगली -शिराळा तालुक्याला भातपिकाचे कोठार म्हणून ओळखले जाते. डोंगर कपारीतील उताराच्या शेती बरोबर नदीकाठच्या सखल शेतीमध्ये भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे शेतकरी अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांची पेरणी करत आहे.
अजूनही काही शेतात पावसाचे पाणी साचलेले
प्रत्येक वर्षी २० मेच्या दरम्यान भात पेरणी करण्यात येते. मात्र मध्यतंरी पडलेल्या मुसळधार पावसामुळे धूळवाफ भात पेरणीस मशागत करुन तयार केलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे पेरणीची कामे आठवडाभरापासून रखडली होती. दरम्यान आता पाऊस नसल्यामुळे शेताला वाफसा येऊ लागला आहे. त्यामुळे आता थोडया प्रमाणात पेरणीस सुरुवात झाली आहे. जमिनीत अजूनही ओलावा असल्यामुळे काही शिवारात माणसांनी कुरी ओढून पेरणी करण्यात येत आहे. अजूनही काही शेतात पावसाचे पाणी साचून आहे. अशा शेतातील पेरण्या आणखी लांबणार आहेत.