सांगली -दादा, आजीच्या अंगावर दागिने, कानातील फुलं आहेत का बघा? ही वाक्य होती, एक नातवाची. मृत्यूनंतर खितपत पडलेल्या आजीच्या मृतदेहाला ढुंकूनही न पाहणाऱ्या नातवाने सोन्याच्या दागिन्यांची हव्यासापोटी केलेली विचारपूस रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी आहेत. नातेवाईक असून देखीलही एका वृद्ध महिलेचा बेवारसाप्रमाणे अंत्यविधी करावा लागला. मन सुन्न करणारी ही घटना सांगलीच्या कवलापूरमध्ये घडली.
आजीच्या मृतदेहापेक्षा नातवाला होती दागिन्यांची चिंता कवलापूरमध्ये एका घरात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. चार ते पाच दिवसांपासून घरात बेवारस स्थितीमध्ये या महिलेचा मृतदेह पडून होता. मृतदेहाची दुर्गंधी येत
असल्याने आजूबाजूच्या नागरिकांना महिलेच्या मृत्यूची कुणकुण लागली. नागरिकांनी याची कल्पना वृद्ध महिलेच्या मुलांना आणि नातेवाईकांनाही दिली. मात्र, कोणीच याठिकाणी फिरकले नाही. अखेर तेथील काही नागरिकांनी सांगलीच्या इन्साफ फाऊंडेशनला बेवारस आजीच्या अंत्यसंस्कारासाठी बोलावले. संस्थेचे मुस्तफा मुजावर हे आपल्या सहकार्यांसोबत कवलापूरमध्ये दाखल झाले.
चार ते पाच दिवसांपासून त्या महिलेचा मृतदेह पडून होता, त्यामुळे मृतदेह सडू लागला होता. अंगावर काटा आणणारी परिस्थिती होती. मुस्तफा आणि त्याची टीम नेहमीप्रमाणे मृतदेहाला कपड्यात गुंडाळण्याच्या तयारीत होते. इतक्यातच त्या महिलेचा एक नातू धावत आला आणि तिच्या अंगावर असणाऱ्या दागिन्यांची चौकशी करू लागला. दादा, आजीच्या कानात फुलं आहेत का बघा? असे म्हणत महिलेच्या अंगावर असणार्या सोन्याच्या दागिन्यांची विचारणा करू लागला. हे ऐकून मुस्तफा आणि त्यांच्या टीमला धक्का बसला. त्यांनी त्या नातवाला फटकारत तिथून जाण्यास सांगितले. ही बाब मुस्तफा यांनी गावातील सरपंच आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असलेल्या भानुदास पाटील यांच्या कानावर घातली. त्यानंतर महिलेचा मृतदेह स्मशानभूमीत नेत अंत्यसंस्कार पार पाडले. पण याठिकाणीही महिलेच्या मुलांनी आईच्या मृतदेहाला हात लावला नाही.
सत्तर वर्षाच्या या महिलेला चार मुले, नातवंड असा परिवार आहे. मात्र, तरीही ती वृद्धापकाळात स्वतंत्रपणे एका खोलीत राहत होती. मृत्यूनंतरही तिच्या अंत्यविधीसाठी नात्यातले कोणीच जवळ आले नाही. त्यामुळे रक्ताची नाती इतकी कशी निर्लज्ज झाली? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.