सांगली - जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे गाव असणाऱ्या कासेगावमध्ये सध्या 38 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे गावात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असून, कोरोनाची स्थिती अटोक्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत जवळपास दोन हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे जयंत पाटील यांच्या कासेगाव या गावात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. सध्याच्या घडीला कासेगाव या ठिकाणी 32 सक्रिय रुग्ण आहेत. वाळवा तालुक्यातील पुणे-बंगळुरू महामार्गावर असणाऱ्या कासेगावची लोकसंख्या जवळपास 15 हजारहून अधिक आहे.
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
जयंत पाटील यांचे गाव असलेल्या कासेगावमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कडक निर्बंध घालण्यात आले असून, विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यात ग्रामस्थांना यश मिळाले आहे. 4 दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. त्यामुळे गावात देखील कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात येत आहेत. गावातील सर्व दुकाने बंद आहेत.
गाव कडकडीत बंद
याबाबत रिअलटी चेक केले असता, गावातील सर्व दुकाने कडकडीत बंद असल्याचे पाहायला मिळाली, केवळ औषध दुकाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हेच सुरू होते, आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी ग्रामस्थ अगदी नियम पाळून येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर शेतात कामाला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त रस्त्यावर कोणीच दिसत नव्हतं, रस्ता अगदी सामसुम असल्याचं पाहायला मिळालं. लहान मुले असतील किंवा महिला असतील, सर्वचजण घरात राहून कोरोनाच्या नियमांचे पालन करताना आढळून आले.
जयंत पाटलांच्या गावात कोरोना निर्बंधांची कडक अंमलबजावणी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
याबाबत कासेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच किरण पाटील यांच्याशी संवाद साधला असता सरपंच पाटील म्हणाले की, राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचं हे गाव आहे, गावावर जयंत पाटील यांचं विशेष लक्ष आहे. गावातील कोरोनाच्या स्थितीबाबत योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना वेळोवेळी जयंत पाटील यांच्याकडून मिळत आहेत. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. गावामध्ये विनाकारण कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही, याशिवाय कोरोनाचे लक्ष आढळल्यास तातडीने त्या व्यक्तीवर उपचार सुरू केले जातात. त्यामुळे गावात फारशी स्थिती गंभीर झालेली नाही, एखाद्या कोरोना रुग्णाची प्रकृती खालावली तर अशा व्यक्तींना इस्लामपूर या ठिकाणी असणाऱ्या कोरोना सेंटर किंवा खासगी रुग्णालयांमध्ये भरती करण्याची सोय करण्यात आली आहे. सध्या गावात एकूण 32 सक्रिय रुग्ण असून, आतापर्यंत गावात एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. कडक निर्बंधांमुळे लवकरच कोरोना नियंत्रणात येईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -पाकिस्तानमधील सर्वात कठीण प्रशासकीय सेवेत पहिल्यांदाच हिंदु महिलेची निवड