सांगली - कोण तुम्ही? आम्ही तुम्हाला ओळखत नाही..गेले १२ दिवस कुठे होता? अशा तीव्र शब्दांत पूरग्रस्तांनी चौकशीसाठी आलेल्या महापौरांना चांगलेच धारेवर धरले आहे. शहराच्या उपनगर भागातील पूरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
शहरातील पूर ओसरल्याने आता स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. मात्र, उपनगरातील काही भागांमध्ये असलेला कचरा पालिका प्रशासनाकडून अद्याप उचलण्यात आलेला नाही. तसेच या ठिकाणच्या पूरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप काकानगर परिसरातील पूरग्रस्तांनी केला आहे. या कचरा प्रश्नी संतापलेल्या नागरिकांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले आहे. त्यावेळी त्यांनी महापौर खोत यांना धारेवर धरले.
पूरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप करून काकानगर परिसरातील पूरग्रस्तांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले आहे. शहरातील बायपास रोडवरील चौकात पूरग्रस्तांनी रस्ता रोखून धरला होता. यामुळे सांगली-इस्लामपूर व नांद्रे -पलूस मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आयुक्तांना संतप्त पूरग्रस्तांनी घेराव घालून तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांनीही या घटनास्थळी धाव घेतल्यावर संतप्त महिलांनी महापौर खोत यांना चांगलेच धारेवर धरले.
अखेर तातडीने मदत तसेच कचरा उचलण्याच्या आश्वासनानंतर पूरग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, शहराच्या अनेक भागात अद्यापही साफसफाई मध्ये दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. यामुळे पूरग्रस्तांमधून संताप व्यक्त होत आहे.