सांगली- पाण्यासह विविध मागण्यांसाठी तासगाव तालुक्यातील शेतकऱयांनी आज रस्ता रोको आंदोलन केले. आरवडे येथे शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे आटपाडी-तासगाव मार्गावरील वाहतूक सुमारे २ तास ठप्प होती. प्रशासनाकडून तातडीने मागण्यांची दखल न घेतल्यास तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱयांनी दिला आहे.
सांगलीच्या तासगाव तालुक्यातील लोढे येथील तलावात शेतीसाठी पाणी सोडावे तसेच अन्य मागण्यांसाठी लोढे तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी आरवडेमध्ये आज रास्तारोको आंदोलन केले. लोंढे तलावात तात्काळ पाणी सोडा, पुणदी उपसा योजना तात्काळ सुरू करा, उपसाबंदी काळातील पाणीपट्टी कमी करा, तोडलेली वीज जोडणी तात्काळ जोडा याशिवाय अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी झाली होती.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव म्हणाले की, लोढे तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या मागणीनुसार विसापूर पुणदी उपसा सिंचन योजनांवर आवश्यक असणारी पाणीपट्टी भरुन काय चूक केली काय? पाणीपट्टी भरल्यानंतर त्यांना पाणी देणे आवश्यक होते. पीक वाळून शेतकरी उद्धवस्त होत आहे, पण प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.